कदाचित ते साल १९९९ असावं, युवा लेखक आणि दिग्दर्शक संतोष पवार यांच्या ‘यदा कदाचित’ नाटकाने रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. गडकरी रंगायतन, ठाणे येथील नाटकाच्या हाऊसफुल्ल प्रयोगाचा मी साक्षीदार होतो. नवोदित कलाकारांच्या मांदियाळीत एक तुडतुड्या तरुण, वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण स्टेज पायाला भिंगरी लावून कव्हर करत लवचिक अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होता. हशा आणि टाळ्या यांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले होते. त्याचवेळी आमच्या आसनाच्या मागील बाजूकडून त्याची कॉलेजियन मित्रमंडळी ‘व्वा सम्या व्वा’ अशी साद घालत उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन देत होते.
नवोदित कलाकारांच्या मांदियाळीत एक तुडतुड्या तरुण, वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण स्टेज पायाला भिंगरी लावून कव्हर करत लवचिक अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होता.
तो तरुण हरहुन्नरी, चतुरस्त्र, आणि अवलिया कलाकार म्हणजेच वर्ष २०१८ पासून लोकप्रिय असलेला टीव्ही शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ गाजवणारा ‘व्वा दादा व्वा’ अशी उत्स्फूर्त दाद मिळवणारा समीर चौघुले होता. ‘यदा कदाचित’ मध्ये अर्जुनाच्या भूमिकेत गोल्डफिशचा प्रतीकात्मक डोळा फोडला आणि त्यानंतर त्याने कधीच मागे फिरून पाहिले नाही. कॉमेडी एक्सप्रेस, कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि अलीकडे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा आधारस्तंभ, तसेच मराठी चित्रपटात अनेक छोट्या मोठ्या भूमिका करत ‘चंद्रमुखी’ आणि ‘गुलकंद’ मधील प्रमुख नायक असा दमदार प्रवास करत मराठी मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा विनोदाचा सुवर्णकाळ आणणारा अभिनेता म्हणून समीर चौघुले यांचे नाव आवर्जून घेतले जाईल.
‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ या धमाल किस्से, गप्पा, आणि मनोरंजनाच्या एकपात्री अभिवाचन प्रयोगाने समीर चौघुलेच्या कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. एकाच कलाकाराने समोरच्या प्रेक्षकांना आपल्या सहज अभिनयाने, आणि संभाषण कौशल्याने अडीच तास खिळवून टाकणे, ही विलक्षण अचंबित करणारी बाब आहे, आणि समीर चौघुले या प्रयोगात प्रेक्षकांना क्षणाचीही उसंत देत नाहीत ही बाब तर कौतुकास्पद म्हणावी लागेल.
अलीकडेच डोंबिवलीतील प्रयोगाला प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने अभूतपूर्व रंगत आणली होती. समीरचे रंगमंचावर पाऊल टाकताच प्रेक्षकांना आपल्या गप्पात सामावून घेण्याचे कौशल्य तर लाजबाब म्हणावे लागेल. एक क्षणात त्यांनी रसिकांच्या मनाची गुरुकिल्ली अगदी सहजच आपल्या खिशात कधी ठेवली, ते सुजाण प्रेक्षकांना देखील कळलेच नाही. आपल्या गोष्टरूपी कथाकथनाच्या वाटेमध्ये प्रेक्षकांना देखील कळत नकळत सहभागी करून घेण्याची हाथोटी तर थक्क करणारी होती. सामान्य माणसाला आयुष्याच्या वळणावर येणारे अफलातून अनुभव विनोदी रंगढंगाच्या मालिकेत गुंफून रसिक प्रेक्षकांच्या पुढे सादर केली जाते. त्याच ओघात ओघवत्या शैलीत ऐकवलेले किस्से तर अफलातूनच होते. त्यांच्या गाण्यांना समोरच्या दर्दी रासिकांकडून मिळणारी ‘वन्स मोअर’ ची दाद तर पैसा वसूल झाल्याची पावतीच होती. ‘पहला नशा पहला खुमार’ गाण्याच्या प्रसंगी प्रेक्षकांच्या मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात उजळलेली सम्याची रंगतदार मैफल रसिकांच्या कायम स्मरणात राहिलं.

विजयकुमार अणावकर
डोंबिवली (पूर्व)
हौशी लेखक, विजयकुमार अणावकर यांनी लिहिलेले बरेचसे लेख आणि मतं तुम्ही महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात वाचली असतील.
![सम्या सम्या मैफिलीत माझ्या — एक रंगतदार मैफल [प्रेक्षक प्रतिक्रिया] samyaa samyaa maifileet majhya](https://i0.wp.com/myrangabhoomi.com/wp-content/uploads/2026/04/samyaa-samyaa-maifileet-majhya.jpg?fit=841%2C473&ssl=1)


