श्री लक्ष्मी नारायण प्रॉडक्शन निर्मित ‘भुल भुलैय्या’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे मोठ्या दिमाखात पार पडला. लेखक हेमंत एदलाबादकर यांच्या कथेवर आधारित ‘भूल भुलैया’ ह्या कलाकृतीला रंगभूमीवर साकार करण्यासाठी तब्बल ५३ वर्षांची अखंड नाट्यसेवा केलेले आणि १२५ कलाकृतींचा समृध्द अनुभव पाठीशी असलेल्या नामवंत ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी यांचा रंगावृती, दिग्दर्शन आणि प्रकाश योजना असा तिहेरी परिसस्पर्श लाभला आहे. अलीकडच्या काळात मराठी रंगभूमीवर नवनवीन आणि दर्जेदार नाटकांचा महापूर आलेला असतानाच वास्तुशास्त्र, तंत्र-मंत्र, भूत-आत्मा, श्रध्दा–अंधश्रध्दा, रहस्य आणि विज्ञान, यांचा अनोखा संगम साधून थरार निर्माण करणाऱ्या ‘भूल भुलैया’ ने रंगभूमीला वेगळी दिशा दाखवण्याचा केलेला प्रयत्न अभिनंदनास पात्र आहे.
Bhul Bhulaiyya Marathi Natak Info
झपाटलेला शापित वाडा आणि त्या वाड्यात काही तरी घडून गेलं आहे, असं सारखं वाटत राहतं. या रहस्यमय वाड्यात घडून गेलेल्या, तसेच घडणाऱ्या गोष्टींबद्दल वाडाच काहीतरी सांगू पाहत आहे, याची जाणीव नाटक पाहताना सतत होत असते. भास आणि वास्तव याचा विचार करत असतानाच, प्रेक्षकांना आपल्या प्रश्नांची उत्तरे सुध्दा मिळतात आणि प्रत्येक घटनेचा उलगडा होत जातो. हा अनुभवच सुजाण प्रेक्षकांना अचंबित करून जातो.
सामाजिक कार्यात गुंतलेल्या आणि अनाथाश्रम चालवणाऱ्या समाजसेविका सत्यभामा इनामदार आणि त्यांचे पती श्यामसुंदर यांचा पूर्वापार असलेला वाडा सध्या भयाण अवस्थेत आहे. या रहस्यमय वाड्याभोवती हे गूढ कथानक सतत फिरत रहाते. सत्यभामा मावशीच्या अनाथाश्रमात वाढलेले दोन विद्यार्थी अभय आणि निशा, आता तरुण सुशिक्षित इंजिनीयर आहेत. आत्मा – भूत यांचे अस्तित्वाबाबत समज – गैरसमज निर्माण करणाऱ्या विचारसरणीवर मात करत रहस्यमय वाड्यात आपले अनाथाश्रम स्थलांतरीत करण्याचा आपला विचार ते दोघे मावशीसमोर मांडतात, आणि इथेच खरा खेळ सुरू होतो. अभय आणि निशाला या झपाटलेल्या वाड्यात काही थरारक अनुभव येतात आणि घडलेल्या रहस्यमय घटनां त्यांचे अंतर्मन विचलित करून टाकतात. त्याचवेळी या विस्मयकरक ‘भूल भुलैया’ च्या चक्रव्यूहामधून बाहेर पडण्याची धडपड सुरू होते. पॅरा-सायकॉलॉजिस्ट डॉक्टर धर्माधिकारी विज्ञानाचा आधार घेऊन भूत-आत्मा, श्रध्दा–अंधश्रध्दा यांचे रहस्य उलगडण्याचे आव्हान स्विकारतात. त्यांचा वैचारिक सामना मांत्रिक रेणुका बिराजदार हिच्याशी होतो. नाटकामधील फ्लॅशबॅक मुळे रंगत अधिकाधिक वाढत जाते. राजशेखर त्यांची पत्नी, धर्मा आणि नारायण यांच्या प्रसंगाने गूढ अधिकच गडद होत जाते, आणि प्रेक्षकही ‘भुलभुलैया’ मध्ये पूर्णपणे अडकून पडतात. या रहस्यमय वाड्याचे गूढ उकलण्यात अभय आणि निशाला यश येते का? डॉक्टर धर्माधिकारी यांचे विज्ञानशास्त्र रहस्य उलगडण्यात यशस्वी होते का? आणि मुख्य म्हणजे सत्यभामा इनामदार वास्तुशास्त्र, तंत्र-मंत्र, भूत-आत्मा, श्रध्दा–अंधश्रध्दा, रहस्य यांनी निर्माण झालेल्या वैचारिक चक्रव्यूहातून बाहेर पडतात का? याचा थरार आणि सस्पेन्स ट्रिक सीन्स सहित प्रत्यक्ष नाट्यगृहात रंगमंचावर पाहणे, हा एक रोमांचक अनुभव आहे, आणि तो रसिक प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.
Bhul Bhulaiyya Marathi Natak Cast
कुमार सोहोनी यांचे दिग्दर्शन विशेष उल्लेखनीय, रंगमंचावर क्षणक्षणाला थरार निर्माण करून समोरील प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात ते पूर्णपणे यशस्वी ठरले आहेत. विशेषतः त्यांनी रंगमंचावरील नेपथ्याचा केलेला आश्चर्यकारक वापर आणि चित्तवेधक ट्रिक सीन्स यामुळे वातावरण निर्मिती अचूक साधली आहे. ‘भुल भुलैया’ ह्या १२५ व्या कलाकृतीने त्यांच्या संस्मरणीय कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. ‘समाजसेविका ‘सत्यभामा इनामदार’ च्या मध्यवर्ती भूमिकेत प्रिया बेर्डे यांनी आपली भूमिका अप्रतिम निभावली आहे. एका थ्रीलर नाटकातील वेगळ्याच भूमिकेतील त्यांचा रंगमंचावरचा वावर अगदी सहज होता. दीर्घ कालावधी नंतर त्यांनी रंगभूमीवर यशस्वी पुनरागमन केले आहे. अमीर तडवळकर यांनी साकारलेला धर्मा त्यांच्या रंगमंचावरील एंट्री आणि एक्झिटने निर्माण होणाऱ्या गुढतेमुळे विशेष लक्षात राहतो. ‘डॉक्टर धर्माधिकारी’ आणि फ्लॅशबॅक मधील ‘राजशेखर’ या दोन्ही भूमिका आशुतोष घोरपडे यांनी अतिशय समंजसपणे साकारल्या आहेत. ‘डॉक्टर धर्माधिकारी’ आणि ‘राजशेखर’ या पूर्णतः भिन्न असलेल्या भूमिका करताना आवाज आणि संवादफेकीतील बद्दल विशेष उल्लेखनीय म्हणावा लागेल. व्यावसायिक नाटकातील पदर्पणातच अशी दुहेरी भूमिका करण्याची संधी कुमार सोहोनी यांच्या सारख्या प्रथितयश दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली मिळणे हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. मांत्रिक रेणुका बिराजदार आणि फ्लॅशबॅक मध्ये राजशेखरची पत्नी अशा दुहेरी भूमिकेत आरती सोळंकी हिने आपली चुणूक दाखवली आहे. अभय सातारकर आणि नारायण या भूमिकेतील साहिल देसाई आणि निशाची भूमिका साकार करणारी परिणीता पावसकर या नवोदित तरुण कलाकारांचे विशेष कौतुक करावे लागेल. विज्ञानाचा आधार घेऊन अंधश्रद्धेवर मात करण्याची तडफ त्यांनी आपल्या अभिनयातून दाखवली आहे. रंगमंचावरील त्यांचा सहज वावर लक्षात राहणारा आहे. विजय सूर्यवंशी यांनी तहसीलदारची छोटीशी भूमिका योग्य साकार केली आहे.
संदेश बेंद्रे यांच्या नेत्रदीपक नेपथ्याचा रंगमंचावरील वातावरण निर्मितीत आणि नाटकाच्या यशात फार मोठा वाटा आहे. विजय गवंडे यांचे पार्श्वसंगीत योग्य परिणाम साधते. मंगल केंकरे यांची वेशभूषा देखील उत्तम. गूढ – रहस्य, थ्रील – थरार आणि सस्पेन्स यांनी भरलेली कलाकृती नाट्यप्रेमी रासिक प्रेक्षकांनी आवर्जून पहायला हवीच. कही भूल न जाना, नक्की पहा ‘भुल भुलैया’.

विजयकुमार अणावकर
डोंबिवली (पूर्व)
हौशी लेखक, विजयकुमार अणावकर यांनी लिहिलेले बरेचसे लेख आणि मतं तुम्ही महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रात वाचली असतील.
![‘भुल भुलैय्या’ – भास आणि वास्तव [प्रेक्षक प्रतिक्रिया] Bhul Bhulaiyya Marathi Natak](https://myrangabhoomi.com/wp-content/uploads/2026/04/bhul-bhulaiyya-cover-1067x600.jpg)

1 Comment
सुंदर परीक्षण , नाटक तर अफलातून जमलय, नवोदित कलाकारांसोबत जुन्या अनुभवी कलाकारांनी भारीच काम केलं आहे! हे नाटक चालणार