- निर्मिती: ऋग्वेद निर्मिती (अभिजात क्रिएशन्स प्रकाशित)
- लेखक व दिग्दर्शक: अशोक समेळ
- मुख्य कलाकार: अशोक समेळ आणि धनश्री प्रधान दामले
- सूत्रधार: दीपक गोडबोले
(टीप: हे नाटक ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या गाजलेल्या कादंबरीवर आधारित आहे.)
Me Ashvatthaama Chiranjeev Natak Review
महाभारतातील सर्वात गूढ, वादग्रस्त आणि वेदनादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘अश्वत्थामा’. भगवान श्रीकृष्णाने दिलेला अमरत्वाचा (चिरंजीवित्वाचा) शाप भोगत तो आजच्या कलियुगातही भटकत आहे, या कल्पनेनेच अंगावर काटा येतो. ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या गाजलेल्या कादंबरीवर आधारित हे नाटक प्रेक्षकांना एका अनोख्या बौद्धिक आणि भावनिक प्रवासावर घेऊन जाते. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांनी या पौराणिक कथेला आधुनिकतेची, मानवी मानसिकतेची आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन एक उत्कृष्ट नाट्यप्रयोग रंगमंचावर आणला आहे.
नाटकाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे अशोक समेळ यांची सशक्त संहिता आणि प्रगल्भ विचारसरणी. या नाटकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लेखक-दिग्दर्शकाने केवळ पुराणातील संदर्भांवर अवलंबून न राहता, आत्ता गेल्या काही वर्षांत सामान्य लोकांनी प्रत्यक्ष अनुभवलेले अश्वत्थामा संदर्भातील अनेक प्रसंग रंगमंचावर दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. अश्वत्थामा आजही कुठे आणि कसा दिसला, लोकांनी त्याच्या अस्तित्वाचे घेतलेले थरारक अनुभव आणि शतकानुशतके बदलत जाणाऱ्या जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा आहे, यावर त्यांनी अचूक प्रकाश टाकला आहे.
Me Ashvatthaama Chiranjeev Natak Cast
लेखन आणि दिग्दर्शनासोबतच मुख्य भूमिका साकारणारे अशोक समेळ यांनी अश्वत्थामाची वेदना, त्याचा अनावर राग आणि शतकानुशतके सोसलेला एकलेपणा आपल्या कसदार अभिनयातून हुबेहूब जिवंत केला आहे. त्यांची देहबोली, भारदस्त आवाज आणि चेहऱ्यावरील कारुण्य-क्रोध यांचे मिश्रण अचंबित करणारे आहे. नाटकातील मध्यवर्ती भूमिकेत धनश्री प्रधान दामले हिने विशेष छाप पाडली आहे. नाटकाच्या गरजेनुसार तिने अत्यंत उत्तमरीत्या विविध पात्रे साकारली आहेत आणि तिच्या या बहुआयामी अभिनयामुळेच ‘अश्वत्थामा’ हे मुख्य पात्र अधिक जिवंत आणि गडद होण्यास मदत झाली आहे. व्यावसायिक रंगमंचावरील हे तिचं पहिलंच नाटक असलं तरीही, तिचा आत्मविश्वास आणि परिपक्व अभिनय पाहता त्या कुठेही नवखी वाटत नाहीत. अशोक समेळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नटासमोर तिने घेतलेली ही झेप थक्क करणारी आहे.
दिग्दर्शक म्हणून अशोक समेळ यांनी नाटकाचा पोत अत्यंत गंभीर आणि तितकाच प्रवाही राखला आहे. पौराणिक संदर्भ, समकालीन वास्तव आणि लोकांचे अनुभव यांचा समतोल त्यांनी लीलया पेलला आहे. सूत्रधार दीपक गोडबोले यांनी नाटकाची सूत्रे उत्तमरीत्या सांभाळली आहेत. या संपूर्ण नाटकात पहिल्यापासून खरं तर दोनच कलाकार रंगमंचावर दिसतात. तरीही, प्रकाशयोजनेच्या सहाय्याने पात्रांच्या सावल्यांचा कल्पक वापर करून रंगमंच भरून काढण्याची अद्भुत किमया दिग्दर्शकांनी केली आहे. मर्यादित पात्रांमध्येही रंगमंचावरील भव्यता आणि प्रसंग जिवंत ठेवण्याची ही अद्भुत कल्पकता दाखवून दिग्दर्शक अशोक समेळ यांनी आपल्या दिग्दर्शनातील प्रदीर्घ अनुभवी कौशल्य सिद्ध केले आहे.
Me Ashvatthaama Chiranjeev Natak Story
नाटकामध्ये रहस्यमय वातावरण आणि काळानुरूप प्रसंग जिवंत करण्यासाठी दिग्दर्शकाने केलेला ‘ए आय’ (Artificial Intelligence) आणि प्रोजेक्टरचा कल्पक वापर थक्क करणारा आहे. हिमालयाची पार्श्वभूमी, ढगांचे गडद सावट आणि काळाचे बदलणारे रंग रंगमंचावर जिवंत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा करण्यात आलेला वापर अत्यंत नाविन्यपूर्ण आणि प्रभावी ठरला आहे. नाटकातील प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीत प्रसंगांची तीव्रता दुप्पट करते. डमरू, शंखनाद आणि वेदनेची जाणीव करून देणारे संगीत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते.
नाटकाच्या शेवटी जेव्हा श्रीकृष्ण अश्वत्थामाला शापमुक्त करण्यासाठी येतो, तेव्हा ‘मी या पृथ्वीच्या आणि मानवाच्या रक्षणासाठी सदैव पृथ्वीवर राहीन’ असा निर्धार अश्वत्थामा व्यक्त करतो. हा निर्धार व्यक्त करतानाचा अशोक समेळ यांचा अभिनय प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणतो आणि हा अभिनय त्यांनी अतिशय उंचीवर नेऊन ठेवला आहे. येथेच या नाटकाचा पडदा पडतो, जो प्रेक्षकांना एका वेगळ्याच विचारात खिळवून ठेवतो.
गाजलेल्या कादंबरीचा सशक्त पाया, केवळ दोन कलाकारांच्या सहाय्याने आणि सावल्यांच्या कल्पक वापराने रंगमंच भरून काढणारे अनुभवी दिग्दर्शन, लोकांचे समकालीन अनुभव, दोन्ही कलाकारांचा कसदार अभिनय आणि नाटकाचा खिळवून ठेवणारा शेवट ही नाटकाची जमेची बाजू आहे. काही उणिवांचा विचार करता, गंभीर संहितेमुळे गंभीर नाट्य वर्तुळाबाहेरील सामान्य प्रेक्षकाला काही तात्विक संवाद समजायला थोडे जड वाटू शकतात, मात्र तंत्रज्ञान आणि कलाकारांचा अभिनय खिळवून ठेवतो.
‘मी अश्वत्थामा चिरंजीव‘ हे केवळ एक पौराणिक किंवा काल्पनिक नाटक नाही; तर ती एका अनंत काळापासून चालत आलेल्या वेदनेची, वर्तमानाची, रक्षणाच्या निर्धाराची आणि प्रत्यक्ष अनुभूतीची लढाई आहे. उत्तम अभिनय, दोन पात्रांमधील भव्यता दाखवणारे सुस्पष्ट दिग्दर्शन, समकालीन संदर्भ आणि रंगमंचावरील अत्याधुनिक तांत्रिक अविष्कार अनुभवण्यासाठी हे नाटक प्रत्येक चोखंदळ नाट्यप्रेमीने थिएटरमध्ये जाऊन आवर्जून पाहावे असेच आहे.
— राकेश तळगावकर
संचालक, कामाक्षी क्रिएटिव्ह
![मी अश्वत्थामा चिरंजीव: पौराणिक शाप आणि आधुनिक मानवी संघर्षाचा एक अंगावर येणारा थरार! [प्रेक्षक प्रतिक्रिया] me ashvatthaamaa chiranjeev cover](https://myrangabhoomi.com/wp-content/uploads/2026/05/me-ashvatthaamaa-chiranjeev-cover-1067x600.jpg)