“युद्ध केवळ रणांगणावर होत नाही, ते माणसाच्या मनातही लढलं जातं आणि काही युद्ध कधीच संपत नाहीत।” या अत्यंत प्रभावी टॅगलाईनसह ‘माणूस फाऊंडेशन’ने रंगभूमीवर आणलेलं हे नाटक केवळ एका ऐतिहासिक प्रसंगाचं सादरीकरण नाही, तर ते प्रेक्षकाला अंतर्मुख करायला लावणारी एक वैचारिक अनुभूती आहे. लेखक-दिग्दर्शक डॉ. सोमनाथ सोनवलकर यांनी इसवी सन पूर्व ३३६ मधील चक्रवर्ती अलेक्झांडर आणि फकीर तत्त्वज्ञ डायोजेनिस यांच्यातील ऐतिहासिक संघर्षाला रंगमंचावर अतिशय ताकदीने जिवंत केले आहे.
नाटकाची कथा दोन मुख्य पात्रांभोवती फिरते. एकीकडे आहे संपूर्ण जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा मॅसेडोनियाचा चक्रवर्ती सम्राटअलेक्झांडर (डॉ सोमनाथ सोनवलकर ), जो भौतिक सत्ता, संपत्ती आणि अहंकाराचे प्रतीक आहे, तर दुसरीकडे शहराबाहेर एका लाकडी पिंपात (Barrel) राहणारा, जगाच्या मोहापासून मुक्त असलेला फकीर तत्त्वज्ञ डायोजेनिस (अरुण कदम), जो आत्मिक सत्य आणि नैतिक शक्तीचे प्रतीक आहे.
Alexander via Diogenes Marathi Natak Review
नाटकात दोन प्रमुख प्रसंगांतून हा वैचारिक संघर्ष पूर्ण ताकदीने उभा केला आहे. पहिल्या प्रसंगात अलेक्झांडरचा बलाढ्य, श्रीमंत आणि अत्यंत पराक्रमी मुख्य सेनापती ‘क्राईटस’ (विनय कांबळे) डायोजेनिसची कीर्ती ऐकून त्याच्या राहण्याच्या जागेपाशी पोहोचतो. त्याच्या अंगावर भरजरी कपडे, मौल्यवान रत्नांचे दागिने आणि चेहऱ्यावर एक राजेशाही ऐट असते. तो डायोजेनिससमोर अत्यंत नम्रतेचा आव आणून साकडे घालतो की, “हे महान तत्त्वज्ञ, मी अलेक्झांडरचा मुख्य सेनापती क्राईटस आहे. माझ्या एका इशाऱ्यावर हजारो सैनिक मान तुकवतात. माझ्याकडे अफाट संपत्ती, अधिकार आणि वैभव आहे; पण माझ्या मनाला शांतता नाही. मला तुमचा शिष्य करून घ्या आणि मला तुमचा मार्ग दाखवा।” डायोजेनिस त्या सेनापतीकडे वरून खाली पाहतो. त्याचा तो राजेशाही थाट आणि त्या नम्रतेच्या मागे दडलेला अहंकार डायोजेनिसला लगेच उमजतो. डायोजेनिस त्याला सरळ नकार न देता, एका कुजलेल्या माशाकडे बोट दाखवून एक अजब अट घालतो की, “जर तुला खरोखरच माझा शिष्य व्हायचे असेल, तर हा कुजलेला, दुर्गंधीयुक्त मासा हातात पकड आणि माझ्या मागे मागे संपूर्ण शहरात, भर चौकात चालत फिरुन ये!” हे ऐकताच क्राईटस थक्क होतो. ज्याच्या नावाचा दबदबा संपूर्ण सैन्यात आहे, तो शहराच्या बाजारात हातात कुजलेला मासा घेऊन कसा फिरणार? लोक त्याची थट्टा उडवतील, याची नाचक्की होईल आणि त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळेल, या भीतीने तो प्रचंड अस्वस्थ होतो. स्वतःच्या खोट्या प्रतिष्ठेचा गुलाम असलेला हा सेनापती ती अट पूर्ण करू शकत नाही. तो शरमून मान खाली घालतो. तो निघून गेल्यावर डायोजेनिस मोठ्याने हसतो जणू काही उद्देशून सत्तेच्या खोट्या प्रतिमेवर अचूक बोट ठेवत म्हणत आहे ” एका कुजलेल्या माशामुळे एका मोठ्या सेनापतीची आणि माझी गट्टी जमू शकली नाही. याला माझा ‘शिष्य’ व्हायचे होते, पण हा स्वतःच्या खोट्या प्रतिष्ठेचा आणि सामाजिक भीतीचा गुलाम आहे!”

नाटकाचा दुसरा प्रसंग हा खरा परमोच्च बिंदू (Climax) आहे. जेव्हा अलेक्झांडर ग्रीसवर आपले पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करतो, तेव्हा त्याचे कौतुक करण्यासाठी आणि त्याला शरण येण्यासाठी अनेक मोठे नेते, राजे आणि विचारवंत धावत येतात. मात्र, शहराबाहेर उन्हात पडलेला डायोजेनिस आपल्याच धुंदीत असतो. तो अलेक्झांडरची साधी दखलही घेत नाही. हे पाहून कुतूहलापोटी आणि स्वतःच्या सत्तेच्या नशेत अलेक्झांडर स्वतः आपल्या सैनिकांसह त्या फकिराला भेटायला निघतो. लखलखते सुवर्ण चिलखत घातलेला, सैन्याने वेढलेला अलेक्झांडर त्या पिंपापाशी येतो आणि उन्हात पडलेल्या डायोजेनिससमोर उभा राहतो. राजाची सावली डायोजेनिसवर पडते. रंगमंचावर या दोन टोकांच्या शक्ती समोरासमोर येतात तेव्हाची शांतता अंगावर काटा आणणारी असते. अलेक्झांडर अत्यंत गर्वाने आणि ऐटीत म्हणतो, “मी जगाचा महान राजा अलेक्झांडर आहे! तुझी कीर्ती ऐकून मी स्वतः इथे आलोय. तुला माझ्याकडून काय हवे ते माग, मी तुझी ती इच्छा आत्ता, याच क्षणी पूर्ण करेन! संपत्ती, जमीन, वैभव… जे हवे ते माग!” डायोजेनिस अत्यंत शांतपणे आपले डोळे उघडतो, जराही विचलित न होता त्या चक्रवर्ती सम्राटाच्या डोळ्यात डोळे घालून पाहतो आणि अतिशय संथ पण ठाम स्वरात उत्तर देतो, “होय, मला तुझ्याकडून एक मदत हवी आहे… जरा बाजूला सरक आणि माझ्या अंगावर येणारा तो सूर्यप्रकाश अडवू नकोस!” हे उत्तर ऐकताच रंगमंचावर जणू वीज कोसळते. जगाला जिंकू पाहणाऱ्या राजाला एका फकिराने बाजूला सरकायला सांगावे? राजाचा हा अपमान पाहून सत्तेचे अंधानुकरण करणारा त्याचा सैनिक (ग्रेगरी फर्नांडिस) संतापून डायोजेनिसवर भाला रोखतो. पण अलेक्झांडर स्वतः स्तिमित होतो. ज्या सूर्यप्रकाशावर राजाचे नियंत्रण नाही, तो राजा कोणाला काय दान देणार? हा सत्तेच्या मर्यादेचा धडा राजाच्या मनाला आरपार भेदून जातो.

तो आपल्या सैनिकाला मागे व्हायचा इशारा करतो आणि थक्क होऊन उद्गारतो, “जर मी अलेक्झांडर नसतो, तर मला डायोजेनिस व्हायला नक्कीच आवडले असते!”
हे नाटक स्वतःहून समकालीन भारतीय राजकारणावर कोणतेही थेट भाष्य किंवा विश्लेषण करत नाही, की कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाचे नाव घेत नाही. नाटक पूर्णपणे त्याच्या ऐतिहासिक चौकटीतच प्रामाणिक राहते. परंतु, रंगमंचावर घडणारे हे प्रसंग, संवादांची धार आणि अलेक्झांडरची देहबोली पाहताना प्रेक्षक म्हणून आपल्याला आजच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीशी याचा संबंध आपोआपच जोडला जातो. नाटकातील अलेक्झांडरचा पराक्रम, त्याचे प्रचंड सैन्य आणि “मी काहीही देऊ शकतो” हा अहंकार पाहतो, तेव्हा आजच्या काळातील सत्ताधाऱ्यांची अमर्याद ताकद आणि बहुमताची घमेंड आपल्याला आपोआप आठवते. तसेच डायोजेनिसने राजाला सत्य सुनावताच त्याच्यावर तातडीने भाले रोखणारे सैनिक प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. आजच्या काळातही जेव्हा एखादा सुजाण नागरिक, पत्रकार किंवा विचारवंत सत्तेला प्रश्न विचारतो, तेव्हा त्याच्यावर तुटून पडणारी ‘ट्रोल आर्मी’ किंवा यंत्रणा आणि हे भाले रोखणारे सैनिक यांतील साम्य प्रेक्षकांच्या मनात आपोआप अधोरेखित होते. अलेक्झांडरने देऊ केलेल्या दानाला नाकारून फक्त ‘सूर्यप्रकाशाची’ मागणी करणारा डायोजेनिस पाहताना, आजच्या सामान्य नागरिकाची अवस्था डोळ्यासमोर उभी राहते. सरकारांनी मोफत योजना किंवा आश्वासनांची खैरात वाटण्यापेक्षा नागरिकांचे मूलभूत हक्क, रोजगार, शांतता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये म्हणजेच आमचा ‘सूर्यप्रकाश’ अडवू नये, हा विचार प्रेक्षक स्वतःहून आजच्या परिस्थितीशी जोडून घेतात.
कलाकारांचा अभिनय हा या नाटकाचा मुख्य कणा आहे.
पात्रांची निवड आणि त्यांचे स्टेजवरील वावरणे नाटकाची पकड घट्ट राखते. एका बाजूला अथांग सत्तेचा अहंकार आणि दुसऱ्या बाजूला शून्यातून निर्माण झालेली आत्मिक शांतता; यांतील ‘सत्य’ रंगमंचावर जिवंत करण्याचे शिवधनुष्य अभिनेते अरुण यांनी एकदम लिलया पेलले आहे. एका फकिराची विरक्ती, चेहऱ्यावरील उपरोधक व तरीही मार्गदर्शक हास्य आणि जगाच्या पाठीवरील कोणत्याही सत्तेचे भय नसलेली निर्भयता त्यांनी आपल्या कसलेल्या, संयमी आणि जिवंत अभिनयातून प्रेक्षकांच्या थेट काळजापर्यंत पोहोचवली आहे. त्यांच्या अभिनयातील तो सहज वावर आणि संवादांची फेक पात्राची तात्त्विक उंची अचूक अधोरेखित करते. विशेष कौतुक म्हणजेच, रंगमंचावर त्यांचं काम बघताना प्रेक्षकाला ‘अरुण कदम’ या हरहुन्नरी अभिनेत्याचा पूर्ण विसर पडतो आणि समोर उभा असलेला माणूस हाच खराखुरा ‘डायोजेनिस’ आहे असा हुबेहूब भास निर्माण होतो! व्यावसायिक अभिनयाची परिसीमा ओलांडून केवळ स्वतःच्या सशक्त आंगिक आणि वाचिक अभिनयाने पात्राशी असं एकरूप होणं, हीच अरुण कदम उर्फ अरुण राधायण यांच्या अभिनय कौशल्याची सर्वात मोठी पावती आहे. दुसरीकडे, नाटकाच्या सुरुवातीला असणारा चक्रवर्ती सम्राटाचा तो अथांग तोरा, डोळ्यांतील जग जिंकण्याची उद्दाम महत्त्वाकांक्षा आणि अहंकाराचा कळस डॉ. सोमनाथ सोनवलकर यांनी आपल्या सशक्त अभिनयातून उत्तमरीत्या जिवंत केला आहे. मात्र, जेव्हा डायोजेनिस सत्तेच्या मर्यादेसंदर्भात अलेक्झांडरचे कान उघडतात, तेव्हा राजाला होणारा अंतर्गत पश्चात्ताप आणि “जर मी अलेक्झांडर नसतो, तर मला डायोजेनिस व्हायला नक्कीच आवडले असते!” हे म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीत उतरलेला कमालीचा नम्रपणा प्रेक्षकांचा ठाव घेतो. सुरुवातीचा अहंकार आणि शेवटच्या प्रसंगातील ही शरणागती-नम्रता या दोन्ही टोकांच्या छटांमधील अभिनयाचा विरोधाभास डॉ सोमनाथ यांनी अत्यंत हुशारीने आणि प्रगल्भतेने रंगवला आहे.

विशेष बाब म्हणजे, डॉ. सोमनाथ सोनवलकर हे स्वतः या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शकही आहेत. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीनही आघाड्यांवर एकाच वेळी वावरताना होणारी ‘तारेवरची कसरत’ त्यांनी अत्यंत लीलया सांभाळली आहे. या तीनही दगडांवर पाय ठेवून रंगभूमीवर सत्तेचं हे महानाट्य यशस्वीपणे सादर करण्याचे कठीण ‘शिवधनुष्य’ अत्यंत कौशल्याने पेलले आहे. तसेच अभिनेता विनय कांबळे यांनी ‘राजधर्म’ आणि ‘शिष्यधर्म’ यांच्या कात्रीत सापडलेला, संभ्रमात पडलेला सेनापती क्राईटस अत्यंत अप्रतिम आणि हुबेहूब साकारला आहे. एका बाजूला डायोजेनिसकडून ज्ञान मिळवण्यासाठी चाललेली धडपड आणि अगतिकता , तर दुसऱ्या बाजूला आपल्या सम्राटाबद्दल मनातील असीम निष्ठा, या दोन्ही भावनांचा समतोल त्यांनी सुंदर साधला आहे. जेव्हा राजा आणि तत्त्वज्ञ समोरासमोर येतात, तेव्हा आपल्या राजाच्या हातून डायोजेनिसचा अपमान तर होणार नाही ना, किंवा राजाकडून डायोजेनीसचे काही अहित तर होणार नाही ना, या विचाराने क्राईटसच्या मनात होणारी घालमेल त्यांनी आपल्या देहबोलीतून हुशारीने पोहोचवली आहे.
या नाटकाच्या यशात तांत्रिक बाजूचा वाटा मोलाचा आहे.
विशेषतः वेशभूषा आणि रंगभूषा या दोन घटकांना या नाटकात अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेशभूषाकार ग्रेगरी फर्नांडिस आणि रंगभूषाकार उलेश खंदारे या जोडीचे काम अत्यंत वाखाणण्याजोगे झाले आहे. डायोजेनिसचे ते फकिरी रूप, चेहऱ्यावरील विरक्ती आणि अलेक्झांडरचे लखलखते चिलखत, राजेशाही वैभव यांतील विरोधाभास वेशभूषा आणि रंगभूषेतून इतका अचूक आणि हुबेहूब साकारला आहे की, पात्रांचे व्यक्तिमत्त्व मंचावर यायच्या आधीच प्रेक्षकांवर मोहिनी घालते. अलेक्झांडर पात्राने परिधान केलेले सुवर्ण रंगाचे नक्षीदार चिलखत, डोक्यावरील पारंपरिक लाल तुऱ्याचा ग्रीक टोप (Helmet) आणि हातातील नक्षीदार तलवार अत्यंत हुबेहूब आणि दर्जेदार वाटते. वेशभूषेचा हा भव्यपणा पात्राचा दरारा आणि ‘सम्राट’ ही प्रतिमा मंचावर येताच प्रस्थापित करतो. राजाच्या भव्य सुवर्ण वेशभूषेच्या अगदी उलट, डायोजेनिसच्या पात्राची वेशभूषा केवळ एका राखाडी रंगाच्या वस्त्रामध्ये (Toga) केली आहे. विस्कटलेली पांढरी दाढी, अंगावर कसलेही अलंकार नसणे आणि हातात एक साधी लाकडी काठी-कंदील असणे, ही वेशभूषा त्यांच्या विरक्त आणि वैचारिक श्रीमंतीचे दर्शन घडवते. ग्रीक संस्कृतीची पार्श्वभूमी अचूकपणे मंचावर जिवंत करण्याचे मोठे श्रेय या दोघांना जाते. नाटकातील नाट्यमयता आणि भावनांची तीव्रता वाढवण्यात श्याम चव्हाण यांची प्रकाश योजना अतिशय समर्पक ठरली आहे. अलेक्झांडर आणि डायोजेनिस यांच्यातील संघर्षाचे प्रसंग गडद करताना आणि विशेषतः जेव्हा डायोजेनिस सूर्यप्रकाशाची मागणी करतो, तेव्हा मंचावर प्रकाशाचा पडलेला तो तीव्र झोत दृश्यांची भव्यता आणि नाटकाचा तात्त्विक अर्थ प्रेक्षकांच्या मनावर अचूक बिंबवून जातो. नेपथ्यकार अरुण राधायण (नेपथ्य निर्माण: सचिन गोताड) यांनी तयार केलेले डायोजेनिसचे ते लाकडी पिंप, रंगमंचाच्या जमिनीवर काढलेले ‘सनडायल’ (सूर्यघड्याळ – रोमन अंकांसह) हे नाटकातील ‘काळ’ आणि ‘सूर्यप्रकाशाचे महत्त्व’ दाखवणारे एक उत्कृष्ट प्रतीक आहे. एका दृश्यात डायोजेनिस काठीच्या साहाय्याने त्यावर सावली पाडताना दिसतात, जे विज्ञानाची आणि तत्त्वज्ञानाची जोड दाखवते. तसेच, मंचाच्या एका कोपऱ्यात असलेला पांढरा ‘कोरिंथियन’ शैलीतील ग्रीक खांब (Column) संपूर्ण नेपथ्याला ग्रीक कालखंडाची अचूक ऐतिहासिक पार्श्वभूमी देतो. मंचावरील साधेपणा सम्राटाच्या सत्तेच्या वैभवासमोर एका वेगळ्याच सत्याची जाणीव करून देतो. तर महेंद्र मांजरेकरांचे पार्श्वसंगीत नाटकातील वैचारिक संघर्षाची तीव्रता वाढवते आणि मंचावरील संवादांना योग्य ती खोली देते. यासोबतच प्रथमेश सावंत (सूत्रधार) आणि रंगमंच व्यवस्था सांभाळणारे कुणाल निकम, हर्षदा केणी, आर्यन हर्चेकर तसेच व्यवस्थापक चिंतू वालकर व मयुरी तांबडे या संपूर्ण टीमच्या पडद्यामागील चोख कामामुळे नाटकाचा प्रवाह कुठेही तुटत नाही.
‘अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस‘ हे नाटक जरी अडीच हजार वर्षांपूर्वीच्या कालखंडावर आधारित असले, तरी त्याचा गाभा सार्वकालिक आहे. नाटक थेट आजच्या राजकारणावर बोलत नसूनही, त्यातील ‘सत्ता विरूद्ध सत्य’ हा प्रदीर्घ संघर्ष आजच्या काळाशी तंतोतंत जोडला जातो. सशक्त संहिता, कसलेला अभिनय, खिळवून ठेवणारी उत्कृष्ट वेशभूषा-रंगभूषा आणि अंतर्मुख करायला लावणारी विचारसरणी यांमुळे हे नाटक प्रत्येक सुजाण नागरिकाने आणि नाट्यप्रेमीने आवर्जून पाहावे असेच आहे. ‘माणूस फाऊंडेशन’चा आणि डॉ. सोमनाथ सोनवलकर यांचा हा प्रयोग मराठी रंगभूमीचा दर्जा उंचावणारा ठरेल यात शंका नाही!
— राकेश तळगावकर
संचालक, कामाक्षी क्रिएटिव्ह
![अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस: न संपणारं युद्ध पर्व…!! [प्रेक्षक प्रतिक्रिया] alexander via diogenes • entry tickets](https://myrangabhoomi.com/wp-content/uploads/2026/06/alexander-via-diogenes-cover-1067x600.jpg)


