भारतीय पौराणिक कथांचा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा ठेवा नृत्य-नाटिकेच्या माध्यमातून जिवंत ठेवणाऱ्या ‘अष्टभुजा नृत्यालय’ संस्थेच्या वतीने एक भव्य आणि विलोभनीय सादरीकरण रंगमंचावर येत आहे. शनिवार, २० जून २०२६ रोजी ‘प्रबोधनकार ठाकरे मुख्य नाट्यगृह’ येथे ‘अलौकिक’ या गाजलेल्या नृत्य-नाट्य मालिकेचा तिसरा भाग “आराध्य दैवत” सादर होणार आहे.
महाराष्ट्राची अस्मिता आणि श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायापासून ते तुळजापूरच्या भवानीमातेपर्यंतच्या स्वयंभू दैवतांच्या सुरस, रम्य कथा आणि त्या त्या प्रदेशातील लोकसंस्कृती या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.
‘आराध्य दैवत’ कार्यक्रमाची तिकिटे पुढील लिंकवर उपलब्ध आहेत →
५१ कलाकारांचा भव्य संच आणि महासंगम
या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात ५१ कलाकारांचा भव्य संच सहभागी होणार आहे. गायक, वादक, नर्तक आणि कथाकार यांच्या त्रिवेणी संगमातून ठेक्यात आणि दिमाखात महाराष्ट्राच्या दैवी संस्कृतीचा एक अविस्मरणीय पट रंगमंचावर साकारला जाईल. भरतनाट्यम्, कथ्थक आणि भारतीय लोककला (Indian Folk) या नृत्यप्रकारांचा अत्यंत शास्त्रशुद्ध आणि देखणा मिलाफ या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
आईचे स्वप्न आणि लेकीचा वसा
‘अलौकिक – A Divine Dance Drama’ या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेची पार्श्वभूमी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी आहे. एका आईने पाहिलेले सुंदर स्वप्न तिच्या नृत्यविशारद कन्येने प्रत्यक्षात आणण्याचा वसा घेतला आणि त्यातूनच या मालिकेचा जन्म झाला. ‘अष्टभुजा नृत्यालय’ संस्थेच्या सौ. उज्वला स. गुढेकर आणि कु. रचिता स. गुढेकर यांच्या संकल्पनेतून आणि सादरीकरणातून हा कार्यक्रम साकारला जात आहे.
यशाची परंपरा: ‘शिव-शक्ती’ आणि ‘ग्रहप्रभा’ नंतर तिसरे पुष्प
यापूर्वी अष्टभूजा नृत्यालयने सादर केलेल्या प्रयोगांना रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या मालिकेतील पहिले पुष्प ‘शिव-शक्ती’ होते, ज्यामध्ये महादेवांचे सप्ततांडव कथक शैलीत तर शक्तीची नवदुर्गा रूपे भरतनाट्यम् शैलीत मांडली गेली होती. त्यानंतर अवकाशातील नऊ ग्रहांच्या कथांवर आधारित ‘ग्रहप्रभा’ ही संपूर्ण कथक शैलीतील नृत्य-नाटिका प्रचंड गाजली. आता ‘आराध्य दैवत’ हे या मालिकेतील तिसरे पुष्प रसिकांच्या भेटीस येत आहे.
हा अभूतपूर्व आणि भक्तीरसाने न्हाऊन निघालेला सांस्कृतिक सोहळा अनुभवण्यासाठी संगीत आणि नृत्यप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

![‘भुल भुलैय्या’ – भास आणि वास्तव [प्रेक्षक प्रतिक्रिया] Bhul Bhulaiyya Marathi Natak](https://myrangabhoomi.com/wp-content/uploads/2026/04/bhul-bhulaiyya-cover-450x253.jpg)

