आजच्या वेगाने बदलणाऱ्या युगात अपूर्ण स्वप्नं, करिअरमधील तडजोडी आणि नात्यांमधील घुसमट यांशी लढा देणाऱ्या तरुणाईची कथा मांडणारा ‘बॅकलॉग’ हा वास्तववादी मराठी दीर्घांक लवकरच रंगभूमीवर दाखल होत आहे. ‘ब्लॅक बॉक्स क्रिएशन्स’ची निर्मिती असलेला हा ८५ मिनिटांचा दीर्घांक आधुनिक काळातील कलावंताचा संघर्ष आणि अस्तित्वाची लढाई अत्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर आणतो. या दीर्घांकाचे पहिले तीनही प्रयोग हाऊसफुल्ल प्रेक्षक प्रतिसादात पार पडले. पुढील प्रयोग १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता द बॉक्स टू, एरंडवणे, पुणे येथे सादर होणार आहे.
‘बॅकलॉग’ तिकीट बुकिंग लिंक
https://ticketkhidakee.com/explore/all/Plays/backlog/6a06b205186928c7be9f7300
प्रेक्षक प्रतिक्रिया
कथानकाचा गाभा: सर्जनशीलता विरुद्ध बाजारपेठ
नाटकाची कथा एका प्रतिभावान पण आर्थिकदृष्ट्या अस्थिर लेखकाभोवती फिरते. कॉलेजच्या दिवसांपासून लेखनालाच सर्वस्व मानणाऱ्या या लेखकाला आयुष्यात स्थैर्य मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. जाहिरातींसाठी खोटं लिहिणं, डॉक्युमेंटरीमध्ये ‘स्पायसी अँगल’ शोधणं, प्रकाशकांची उदासीनता, निर्मात्यांच्या व्यावसायिक अपेक्षा आणि सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे सर्जनशील क्षेत्रात होत असलेले बदल… या सगळ्यांमुळे त्याच्या आयुष्यात अपूर्ण राहिलेल्या गोष्टींचा एक प्रचंड ‘बॅकलॉग’ तयार होतो.
या संघर्षाचा परिणाम त्याच्या वैवाहिक आयुष्यावरही होतो. अनेक वर्षे त्याच्या स्वप्नांना पाठिंबा देणारी त्याची पत्नी मातृत्व, आर्थिक सुरक्षितता आणि वास्तवाच्या दबावाखाली त्याला एक अंतिम मुदत (Deadline) देते. यामुळे त्यांचे नातं एका निर्णायक वळणावर येऊन ठेपते.
एका संपूर्ण पिढीचं प्रतिनिधित्व
या नाटकात केवळ लेखकाचीच कथा नाही, तर त्याच्यासोबत कमर्शियल इंडस्ट्रीकडे वळलेला अभिनेता मित्र, वकील, इंजिनियर आणि स्पर्धा परीक्षा देणारा ‘परीक्षाजीवी’ तरुण अशी विविध पात्रे पाहायला मिळतात. बदलत्या काळाने आणि सिस्टमने आपल्याला ‘आउटडेटेड’ ठरवले आहे का, या भावनेशी ही सर्व पात्रे झुंजताना दिसतात. सोशल मीडिया, AI आणि बाजारपेठेच्या युगात माणसाची खरी किंमत काय? हा थेट प्रश्न हे नाटक उपस्थित करते.
नाटकाचा मूळ हेतू
“वास्तव आणि कल्पनेच्या सीमारेषेवर उभे राहून प्रेक्षकांनी स्वतःच्या आयुष्यातील ‘बॅकलॉग’कडे एकदा तरी आत्मपरीक्षणाच्या नजरेने पाहावे, हा या नाटकाचा प्रामाणिक प्रयत्न आहे,” असे नाटकाच्या टीमकडून सांगण्यात आले.
- निर्मिती: ब्लॅक बॉक्स क्रिएशन्स
- लेखन व दिग्दर्शन: योगेश शेजवलकर
- कालावधी: सलग ८५ मिनिटे
- कलाकार: तृप्ती उखंडे, प्रतुल पवार, सागर दातार, योगेश भांडारी, वरुण समर्थ आणि योगेश शेजवलकर
- नेपथ्य: हर्षद गोडबोले
- प्रकाश योजना: साई सगरी
- पार्श्वसंगीत: हर्ष मलजी
बदलत्या सामाजिक आणि आर्थिक समीकरणांमध्ये अडकलेल्या आजच्या पिढीची ही व्यथा रंगभूमीवर अनुभवण्यासाठी नाट्यरसिक उत्सुक आहेत.
