मराठी रंगभूमीवर सध्या ज्या नाटकाची सर्वाधिक चर्चा आहे, ते म्हणजे रहस्य आणि थराराने भारलेले ‘अ परफेक्ट मर्डर’! सर अल्फ्रेड हिचकॉक यांच्या अजरामर कलाकृतीवर आधारित असलेल्या या नाटकाने पहिल्या प्रयोगापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. नीरज शिरवईकर यांचे खिळवून ठेवणारे लेखन आणि विजय केंकरे यांचे कसलेले दिग्दर्शन लाभलेल्या या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. नात्यांमधील गुंतागुंत, थरार आणि अनपेक्षित वळणे अनुभवण्यासाठी नाट्यप्रेमींची पावले आपोआपच नाट्यगृहांकडे वळत आहेत.
या लोकप्रिय नाटकात आता एका नव्या आणि दमदार चेहऱ्याची भर पडली आहे. अनिकेत विश्वासराव आणि सतीश राजवाडे यांसारख्या तगड्या कलाकारांसोबत आता लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले एका अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे, आजवर मालिका आणि हलक्याफुलक्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या रुपाली भोसले या नाटकातून पहिल्यांदाच एका पूर्णपणे गंभीर आणि वेगळ्या भूमिकेत झळकणार आहेत.
‘कोरी पाटी’ घेऊन केली कामाला सुरुवात – रुपाली भोसले
आपल्या या नवीन भूमिकेबद्दल आणि अनुभवाबद्दल बोलताना रुपाली भोसले म्हणतात, “मी यापूर्वी अनेक विनोदी नाटकांमध्ये काम केले आहे, पण सस्पेन्स-थ्रिलर प्रकारातील नाटक करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. मी कोणतीही नवी भूमिका स्वीकारताना जुन्या गोष्टींचे दडपण न घेता ‘कोरी पाटी’ होऊन कामाला सुरुवात करते. आधी काय घडले यापेक्षा ‘या क्षणी मी प्रेक्षकांसमोर काय सादर करतेय’ याला माझे प्राधान्य असते.”
दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त करत त्या पुढे म्हणाल्या, “विजय सर आणि सर्व सहकलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव अद्भुत आहे. विजय सरांचा नाट्यसष्टीतील अनुभव इतका दांडगा आहे की, त्यांच्यासोबत काम करताना दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळते. संपूर्ण टीमची केमिस्ट्री उत्तम जुळून आली असून, सहकलाकारांच्या ऊर्जेमुळे हा प्रवास अधिकच आनंददायी ठरत आहे.”
बदाम राजा प्रोडक्शन निर्मित, माधुरी गवांदे व निनाद कर्पे उत्पादित या नाटकाचे लेखन व नेपथ्य नीरज शिरवईकर यांचे असून दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे. रंगभूमीवर घोडदौड करणाऱ्या या दर्जेदार सस्पेन्स-थ्रिलर नाटकाचा मनसोक्त अनुभव घेण्यासाठी नाट्यप्रेमींनी आवर्जून या नाटकाला नक्की भेट द्यावी!



