‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाने अनेक नवोदित कलाकारांना ओळख दिली, शिवाय सहभागी कलाकारांचे करिअर घडवण्यात देखील ह्या लोकप्रिय कार्यक्रमाचा मोलाचा वाटा आहे. संधीचं सोनं करणाऱ्या रथी-महारथींच्या जत्रेत कोंकणवासीय युवा कलाकार ‘श्रमेश बेटकर’ या हरहुन्नरी, चतुरस्त्र आणि अवलिया कलाकाराने अल्प-कालावधीतच आपल्या अभिनयाचा आणि लेखन कौशल्याचा ठसा उमटवलेला प्रकर्षाने दिसून येत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील प्रामुख्याने चि. सौ. का., अकबरे बेटकर, आणि ‘शेंदरू गाणू देवलेकर’ अशा विविध बहुरंगी बहूढंगी भूमिकेत आपली वेगळीच छाप पाडणारा श्रमेष बेटकर यांच्या “Shramesh Betkar Show — थोडं नॉटी थोडं थॉटी’ या “मराठमोळा” स्टँडअप बद्दल उत्सुकता होतीच आणि पार्ल्यातील हाऊसफुल्लच्या बातमी नंतर तर ती प्रचंड वाढीस लागली होती.
कॉकटेल स्टुडिओ निर्मित ‘थोडं नॉटी थोडं थॉटी’ या धमाल कौटुंबिक किस्से, राजकीय गप्पा, आणि सामाजिक प्रबोधन यांचे मनोरंजक सादरीकरण करणाऱ्या एकपात्री स्टँडअप प्रयोगाने ‘श्रमेश बेटकर’ या तरुण कलाकाराच्या कारकिर्दीत प्रारंभालाच एक मानाचा तुरा खोवला आहे. आजपर्यंत अनेक नामांकित कलाकार, मान्यवर लेखकांनी कथाकथनाचे-अभिवाचनाचे कार्यक्रम फक्त सादरच केले नाहीत, तर प्रचंड गाजवले आणि यशस्वीही केले. ‘श्रमेश बेटकर’ हा तरुण कलावंत आज सन्मानाने त्या पंक्तीत सामील झाला आहे.
डोंबिवलीतील दुसराच शो देखील प्रेक्षकांनी तुडुंब भरलेला आणि दणक्यात हाऊसफुल्ल होता. श्रमेशने रंगमंचावर पाऊल टाकताच टाळ्या आणि शिट्टयांच्या आवाजात संपूर्ण प्रेक्षागृह दणाणून गेले होते. काही क्षणातच ‘श्रमेश’ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी झाला आणि सुजाण प्रेक्षक देखील नकळत या हास्य प्रवासात सामील झाले. रसिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रमाला अभूतपूर्व रंगत आणली होती. प्रेक्षकांना आपल्या गप्पात सामावून घेण्याचे त्यांचे कौशल्य तर लाजबाब म्हणावे लागेल. आपल्या ‘मराठमोळा स्टँडअप’ कथाकथनाच्या प्रवासामध्ये समोरील प्रेक्षकांना देखील सामावून घेण्याची त्याची हाथोटी तर थक्क करणारी होती. सामान्य माणसाला आयुष्याच्या वळणावर येणारे अफलातून अनुभव विनोदी रंगढंगाच्या मालिकेत गुंफून रसिक प्रेक्षकांच्या पुढे सादर करण्यात आले.
अलीकडच्या काळात राजकीय आणि सामाजिक संवेदनशील विषयावर भाष्य करणे तसे सहज सोप्पे राहीलेलं नाही, मात्र त्याअनुषंगाने ऐकवलेले किस्से आणि आवर्जून दिलेले टोले प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवून गेले. नवोदित कलाकाराने आपल्या सहज अभिनयाने, आणि संभाषण कौशल्याने प्रेक्षकांना अडीच तास खिळवून ठेवणे, ही विलक्षण अचंबित करणारी कला आहे. श्रमेश बेटकर या प्रयोगात प्रेक्षकांना खळखळून हसवत क्षणाचीही उसंत देत नाही, ही बाब तर कौतुकास्पद म्हणावी लागेल. त्यांच्या गाण्याला आणि नृत्याला समोरच्या दर्दी रासिकांकडून मिळणारी ‘वन्स मोअर’ ची दाद तर पैसा वसूल झाल्याची पावतीच होती.
‘थोडं थोडं’ म्हणता म्हणता रसिक प्रेक्षकांना मनोरंजनाच्या भरपेट थाळीचा आस्वाद घेता आला. प्रेक्षकांना खूप खूप थॉटी करण्यात खरंच यशस्वी झालास श्रमेश ‘यु नॉटी बॉय’.
Shramesh Betkar Upcoming Shows
No upcoming shows.
![‘श्रमेश’ यु नॉटी बॉय ! [प्रेक्षक प्रतिक्रिया] shramesh betkar prekshak pratikriya cover](https://myrangabhoomi.com/wp-content/uploads/2026/08/shramesh-betkar-prekshak-pratikriya-cover-1075x600.jpg)

