१९५० ते १९८५ या कालखंडातील पश्चिम महाराष्ट्राची सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेले, दोन बालमित्रांच्या अनोख्या प्रवासाची साक्ष देणारे ‘अंतराय‘ हे नवीन नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. ‘कलाश्रय‘ या निर्मिती संस्थेचे हे पहिलेच प्रायोगिक नाटक असून, याद्वारे मराठी रंगभूमीवर एक अत्यंत संवेदनशील आणि सर्जनशील प्रयोग सादर केला जात आहे.
शुभारंभ
मुंबई → शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता @ रवींद्र नाट्य मंदिर मिनी थिएटर, दादर.
पुणे → शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० वाजता @ द बॉक्स टू, एरंडवणे.
या नाटकाच्या तिकीट बुकिंगसाठी BookMyShow वर ऑनलाइन सुविधा उपलब्ध असून, फोन बुकिंगसाठी ७०२१३३१८०२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
अष्टपैलू लेखिका-दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी
या नाटकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मराठी रंगभूमीवर आपल्या अष्टपैलू दिग्दर्शनाने आणि टोकदार लेखनाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रतिमा कुलकर्णी यांनी याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. मानवी नात्यांचे सूक्ष्म पदर, सामाजिक वास्तव्य आणि मनातील भावनांचा गुंता अत्यंत सहजतेने आणि ताकदीने रंगमंचावर मांडण्यात प्रतिमा कुलकर्णी यांचा हातखंडा आहे. त्यांच्याच दिग्दर्शकीय शैलीमुळे ‘अंतराय’मधील दोन भिन्न विचार आणि जातिभेदाच्या भिंतींमध्ये अडकलेल्या बालमित्रांची ही कथा अधिक जिवंत आणि प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार यात शंका नाही.
काय आहे ‘अंतराय’?
यशवंत भोसले आणि देवयानी पटवर्धन या दोन भिन्न स्वभावाच्या आणि वेगवेगळ्या जगातून आलेल्या बालमित्रांची ही कथा आहे. दोन वेगळी घराणी, भिन्न मूल्ये, विचार आणि त्या काळात त्यांच्यात असलेला तीव्र जातिभेद अशा अनेक गोष्टींच्या भिंती त्यांच्यामध्ये उभ्या असतात.
यशवंत हा स्पष्ट ध्येय असलेला, उच्च आदर्श, नैतिक मूल्ये आणि स्वतःच्या तत्त्वांशी प्रामाणिक असणारा तरुण आहे. याउलट, देवयानीचे आयुष्य मात्र संभ्रमित, चंचल, सर्जनशील आणि भावनाप्रधान आहे. माणसांच्या गराड्यात असूनही मनातील विचार कोणाजवळ व्यक्त करावेत, हे न उमजल्यामुळे ती प्रचंड एकाकी असते. या दोन भिन्न विश्वांना जोडणारा एकमेव दुवा म्हणजे यशवंत. देवयानीच्या मनातील वादळे, तिचे वेडेवाकडे विचार आणि भावनांचे गुंते ती केवळ यशवंतजवळच मोकळेपणाने व्यक्त करू शकते; कारण तिचे मन समजून घेणारा तो एकमेव माणूस असतो.
संवाद आणि पत्रांतून उलगडणारा प्रवास
वर्षानुवर्षे चाललेला संवाद आणि पत्रांच्या देवाणघेवाणीतून या नाटकाचे कथानक पुढे सरकते. काळ बदलतो, आयुष्य नवी वळणे घेतो, पण त्यांच्या नात्याभोवतीचे प्रश्न कायम राहतात. कधी निरागस मैत्री, कधी मनात दडलेल्या भावनांची चाहूल तर कधी असहायता — या सगळ्यांतून दोन व्यक्तींच्या आयुष्याला समाजाच्या चौकटी कशा आकार देतात, याची प्रकर्षाने जाणीव हे नाटक करून देते.
कलाकार आणि तांत्रिक बाजू
निर्मिती संस्था: कलाश्रय (स्वानंद केतकर)
लेखन व दिग्दर्शन: प्रतिमा कुलकर्णी
संगीत: मिलिंद जोशी (संगीत संयोजन: प्रतीक यादव)
प्रकाशयोजना: आकाश पांचाळ
वेशभूषा: सोहा कुळकर्णी
कलाकार: शर्वरी पाटणकर आणि अक्षय शिंपी
‘कलाश्रय’ संस्थेने यापूर्वी ‘मुशाफिरी‘, ‘इजाफत’ यांसारखे कार्यक्रम, त्याचप्रमाणे लघुपट आणि डिजिटल माध्यमांमध्ये दर्जेदार निर्मिती केली आहे. आता ‘अंतराय’च्या माध्यमातून ते रंगभूमीवर एक वेगळा अनुभव घेऊन येत आहेत.
मराठी रंगभूमीवर एक आगळावेगळा भावनिक आणि वैचारिक प्रवास अनुभवण्यासाठी नाटक आवर्जून पाहा!

