रंगभूमीवर नेहमीच नवनवीन विषय आणि प्रयोग हाताळले जातात. याच मालिकेत आता ‘लाल सलाम‘ हा एक नवा दीर्घांक प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. नीरजा वर्तक आणि आयुष आशिष भिडे यांनी या दीर्घांकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून, त्यांच्या या नव्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी सुरुवातीलाच डोक्यावर घेतले आहे — येत्या २ ऑगस्ट २०२६ रोजी होणारा या नाटकाचा शुभारंभाचा पहिलाच प्रयोग ‘हाऊसफुल’ झाला आहे.
संशोधन आणि प्रयोगाचा प्रवास
रंगभूमीवर काहीतरी वेगळे आणि हटके सादरीकरण करण्याच्या तीव्र इच्छेतून या नाटकाची बीजे रोवली गेली. एका वेगळ्या आणि संवेदनशील विषयाला हात घालण्यासाठी लेखिका-दिग्दर्शक नीरजा वर्तक आणि आयुष भिडे यांनी मोठा अभ्यास आणि सखोल संशोधन (Research) केले. दैनंदिन चर्चेतून पुढे आलेल्या नवनवीन मुद्द्यांचा मागोवा घेत, सुरुवातीला एका एकांकिकेची निर्मिती झाली. पुढे या एकांकिकेला मिळालेल्या प्रतिसादानंतर तिचे रूपांतर एका परिपूर्ण दीर्घांकात करण्यात आले.
काय आहे लाल सलाम?
आजच्या तरुण पिढीसमोर नक्षलवादाचा मुद्दा मांडताना—मुळात नक्षलवाद म्हणजे काय? लोक या चळवळीकडे कसे वळले? आणि त्यामागची नेमकी वस्तुस्थिती काय होती? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न या नाटकातून करण्यात आला आहे. शिक्षण, जमिनीचे व्यवहार, कौटुंबिक परिस्थिती, जात आणि इतर महत्त्वाच्या सामाजिक समस्या या विषयांच्या माध्यमातून हा नाट्याविष्कार प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे.
कलाकार आणि तंत्रज्ञ
या दीर्घांकाात पूर्वा फडके, आयुष आशिष भिडे, शुभम संदीप जाधव, मिहीर विवेक जोग, कैलास मेस्त्री, नीरजा अविनाश वर्तक, सलोनी शिंदे आणि शार्वी वर्तक यांसारख्या प्रतिभावान कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.
चाकोरी बाहेरच्या ‘घोर’ नंतर ‘लाल सलाम’ चा धमाका
याच टीमचा यापूर्वी आलेला ‘घोर’ हा दीर्घांक तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला यांच्या प्रयोगशीलतेची माहिती असेलच. ‘घोर’च्या वेगळ्या कथाकथनाने आणि रहस्यमय प्रवाहाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. ‘घोर’ च्या यशानंतर, ‘लाल सलाम’ च्या आव्हानात्मक विषयाला हात घालण्याचे धैर्य टीमने दाखवले आहे, ज्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
पहिल्याच प्रयोगाला मिळालेल्या या तुफान प्रतिसादाबद्दल बोलताना नीरजा वर्तक आणि आयुष भिडे यांनी नटराजाचे आभार मानत मायबाप रसिकप्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. रसिकांचे हेच प्रेम आणि साथ यापुढेही सातत्याने पाठीशी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
शुभारंभाचा प्रयोग → २ ऑगस्ट, २०२६ • दु. ४:३० वा. • जयवंत दळवी लघुनाट्यगृह, प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर, बोरिवली (प).
