आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्टीवर कुणाचा ना कुणाचा शिक्का बसल्याशिवाय त्या गोष्टीला अधिकृत मान्यता मिळत नाही, असा आपल्या समाजाचा एक अलिखित नियमच आहे. मग ते नवरा-बायकोचं नातं असो, नोकरी-व्यवसाय असो की आपल्या स्वभावाचे दाखले! पण समाज आणि लोकांचे हेच ‘शिक्के’ बाजूला सारून स्वतःच्या हिंमतीवर उत्तुंग कामगिरी करणाऱ्या माणसांची एक वेगळीच तऱ्हा असते. नेमक्या याच मानवी स्वभावाच्या आणि कौटुंबिक नातेसंबंधांच्या हलक्या-फुलक्या पदरांवर प्रकाश टाकण्यासाठी रंगभूमीवर एक नवं कोरं नाटक सज्ज झालं आहे. तरंगिणी एंटरटेनमेंट निर्मित या आगामी नाटकाचे नाव आहे ‘शिक्कामोर्तब‘.
विशेष म्हणजे, ‘बिग बॉस मराठी ६’ च्या घरामधून संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकून बाहेर पडलेला लोकप्रिय अभिनेता सागर कारंडे या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या पहिल्या प्रेमाकडे म्हणजेच रंगभूमीकडे वळला आहे. दोन जोडप्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटना, इगो, गैरसमज आणि त्यातून उडणारा प्रचंड गोंधळ या नाटकाच्या माध्यमातून विनोदी ढंगात मांडण्यात आला आहे.
तगडी स्टारकास्ट आणि कसलेले तंत्रज्ञ
या नाटकात प्रेक्षकांना खळखळून हसवायला आणि विचार करायला लावायला प्रमुख भूमिकेत सागर कारंडे सोबतच मराठी मनोरंजन सृष्टीतील मातब्बर कलाकार भक्ती रत्नपारखी, कांचन पगारे आणि अनिशा सबनीस रंगमंच गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
नाटकाच्या बॅकस्टेज टीमवर नजर टाकली तर इंडस्ट्रीमधील दिग्गज तंत्रज्ञांची नावे समोर येतात:
- लेखन आणि दिग्दर्शन: प्रमोद विठ्ठल शेलार
- लेखन सहाय्य: विनोद जाधव
- नेपथ्य: संदेश बेंद्रे
- प्रकाश योजना: शीतल तळपदे
- संगीत: अभिजीत पेंढारकर
- गीतकार: वलय मुळगुंद
- रंगभूषा व वेशभूषा: चंदर आणि दर्शना चौधरी
- निर्मिती प्रमुख: महेंद्र खराडे
कधी आणि कुठे होणार शुभारंभ?
एका अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि रिलेटेबल विषयावर भाष्य करणाऱ्या या व्यावसायिक नाटकाचा भव्य शुभारंभ येत्या १२ जून रोजी, दुपारी ४ वाजता, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (मुंबई) येथे होणार आहे.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात निखळ मनोरंजनाची हमी देणारे हे नाटक नेमके कोणत्या गोष्टींवर आणि नात्यांवर ‘शिकामोर्तब’ करणार, हे पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांमध्ये आतापासूनच कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. नाटकाचे तिकीट बुकिंग लवकरच ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होईल.
Upcoming Shows
-
31 JUL

![अलेक्झांडर व्हाया डायोजेनिस: न संपणारं युद्ध पर्व…!! [प्रेक्षक प्रतिक्रिया] alexander via diogenes • entry tickets](https://myrangabhoomi.com/wp-content/uploads/2026/06/alexander-via-diogenes-cover-450x253.jpg)

