मराठी साहित्यातील विद्रोहाचे जनक आणि ‘दलित पँथर’चे संस्थापक कवी नामदेव ढसाळ यांच्या धारदार कविता आता नृत्याच्या माध्यमातून रंगमंचावर जिवंत होणार आहेत. ढसाळांच्या निवडक कवितांवर आधारित ‘भयंकराच्या दरवाज्यात कोण?’ या विशेष नृत्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या ढसाळांच्या साहित्याला नृत्याची जोड देऊन समाजातील शोषितांचे वास्तव या प्रयोगातून मांडले जाईल.
२७ जून रोजी, शनिवारी, रात्री ९:३० वाजता भरत नाट्य मंदिर, पुणे येथे ‘भयंकराच्या दरवाज्यात कोण?’ या नृत्य प्रयोगाचा पुढील प्रयोग सादर होणार आहे. तिकिट विक्री येथे सुरू आहे.
त्यापुढील प्रयोगांबद्दल माहितीसाठी तुम्ही Instagram वर @nirmaan_arts_official या अकाऊंटला भेट देऊ शकता.
View this post on Instagram
वंचितांच्या जगण्याचे दाहक वास्तव
नामदेव ढसाळ यांचे काव्य हे नेहमीच प्रस्थापित व्यवस्थेने वाळीत टाकलेल्या घटकांना वाचा फोडणारे ठरले आहे. दलित, कामगार, आदिवासी, वेश्या आणि तृतीयपंथी यांच्या जगण्यातील संघर्ष, त्यांच्यावर होणारा अन्याय, पिळवणूक आणि जुलुमी समाजावर त्यांनी आपल्या लेखणीतून सडेतोड व रोखठोक भाष्य केले. हाच संघर्ष आणि त्यांच्या जगण्याचे दाहक वास्तव या नृत्य प्रयोगाच्या केंद्रस्थानी असणार आहे.
नृत्य, लय आणि अभिनयातून विद्रोहाचे स्मरण
या प्रयोगाविषयी संयोजकांनी सांगितले की, “हा केवळ एक कलाविष्कार नसून, समाजावर ओढवलेले भयंकर सत्य – जसे की नकार, अवहेलना आणि अत्याचार – नृत्याच्या माध्यमातून मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ढसाळांच्या विचारांचे आणि मूकपणाला धुडकावून लावणाऱ्या त्यांच्या बंडखोर वृत्तीचे स्मरण या निमित्ताने केले जाईल.
नृत्य, लय आणि विशिष्ठ देहबोलीच्या माध्यमातून ‘भयंकर’ या संकल्पनेचा शोध घेतला जाईल. यात प्रत्येक शोषित समाज हा कोंडमारा कसा सहन करतो, हे प्रभावीपणे दाखवले जाईल.”
हा प्रयोग म्हणजे नामदेव ढसाळ यांच्या दूरगामी आणि शक्तिशाली विचारसरणीला दिलेली एक आदरांजली ठरेल, यात शंका नाही. अन्यायकारक शांततेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या या अनोख्या सांस्कृतिक प्रयोगाकडे आता तमाम कलाप्रेमी आणि साहित्यिकांचे लक्ष लागले आहे.

![‘श्रमेश’ यु नॉटी बॉय ! [प्रेक्षक प्रतिक्रिया] shramesh betkar prekshak pratikriya cover](https://i0.wp.com/myrangabhoomi.com/wp-content/uploads/2026/08/shramesh-betkar-prekshak-pratikriya-cover.jpg?fit=450%2C251&ssl=1)

