संस्कृत साहित्यातील सुवर्णकाळ आणि भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीचा अद्भूत महिमा उलगडणारा एक विशेष सांस्कृतिक सोहळा मुंबईत रंगणार आहे. ‘संस्कार भारती उत्तर मुंबई’ यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक १९ जून २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता ‘संगीत कविराज जयदेव’ या हिंदी नाट्य अभिवाचनाचे संगीत वाद्यवृंदासमवेत आयोजन करण्यात आले आहे. बोरिवली येथील शिंपोली भागातील ‘अटल उद्यान’ येथे हा कार्यक्रम संपन्न होईल.
आव्हानात्मक जीवन आणि अद्वितीय कृष्णभक्ती
१२ व्या शतकात जेव्हा संस्कृत साहित्याचा दिवा मंदावत चालला होता, अशा काळात महाकवी जयदेव यांनी आपल्या कालजयी रचनांनी साहित्याला एक नवीन चैतन्य दिले. त्याचं साहित्य म्हणजे एक चमत्कारच होता. त्यांचे संपूर्ण जीवन हे भक्ती आणि आव्हानांनी वेढलेले होते. देवाला समर्पित असलेल्या ‘पद्मावती’ नावाच्या कन्येशी विवाह करण्याचे धाडस त्यांनी दाखवले आणि त्यानंतर त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. श्रीकृष्ण भक्तीचा साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी रचलेले काव्य आजही रसिक मनावर अधिराज्य गाजवत आहे.
याच मनस्वी कृष्णभक्त कवी जयदेव यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या साहित्याचा वेध या नाट्य अभिवाचनातून घेतला जाणार आहे.
प्रवेश विनामूल्य
संगीत आणि साहित्याची उत्तम सांगड घालणारा हा कार्यक्रम सर्व कलाप्रेमी आणि रसिकांसाठी खुला आहे. तरी मुंबईतील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि कृष्णभक्तांनी या सुश्राव्य संगीतमय नाट्य अभिवाचनाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कार भारती उत्तर मुंबई परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

![‘श्रमेश’ यु नॉटी बॉय ! [प्रेक्षक प्रतिक्रिया] shramesh betkar prekshak pratikriya cover](https://i0.wp.com/myrangabhoomi.com/wp-content/uploads/2026/08/shramesh-betkar-prekshak-pratikriya-cover.jpg?fit=450%2C251&ssl=1)

